बुधवार, २ जानेवारी, २०१९

आता पुन्हा नभ स्वच्छ रे

राज्य आले प्रकाशाचे , तेजात भरले विश्व रे 
संपल्या अंधार लाटा , जाई तयां  विसरून रे 

रंगलेला खेळ असता माथ्यावरी ये सावट 
विखुरले वाऱ्यावरी ते , आता पुन्हा नभ स्वच्छ रे 

अंधार मार्गी दाविले जे धैर्य आणिक जिद्द तू 
तुकवून माना मानसी देती सलामी सर्व रे 

धावून आले संकटी आधार देण्याला तुला 
राही ऋणी त्यांच्या सदा , देई तयांना मान रे 

हारणे वा जिंकणे हातात नव्हते रे तुझ्या 
यशलाभ हा 'त्या'ची कृपा तू ठेव याची जाण रे 

काळोख जाता संपुनी उजळून जातो  मार्ग हा
सरसावुनीया जा पुढे , दावी नवे चैतन्य रे   

मार्गात पुढच्या तू सुखाने जावे मनोमन हर्षुनी
'त्या'च्या पदी ठेवून माथा मागतो हे दान रे  

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

नववर्षाचे आगमन !

कडाडे नागरा नि घंटा घणाणे, नभाला स्वरांची भरारी भिडे
निघाले तयाच्या विसारून खेदा, नव्या स्वागताची सलामी झडे

त्याच्या सुराज्यात होते असे की जणू कल्पवृक्षातळीं सावली
जयाची मनीषा धरावी जनांनी सुखे काल येथे मला भेटली

कधी वेदना स्पर्श झाला कळांचा, कधी  क्रंदलो  स्वप्न की भंगुनी
मला ना तयाचे परी दु:ख काही, कडू ,गोड सारे हवे जीवनी

तुझ्या काय आहे मनीं ठाउके ना, उतावीळ ना मी, असो गुप्तता
भाविष्यावरी जोर माझा न चाले, विचारू कशा हर्ष की खिन्नता

प्रभूच्या पदाशी विसावून माथा अशा या घडीला तया प्रार्थितो
न झाले पुरे काल हातून माझ्या घडावे पुरे आज ते मागतो

सराले तयाची न चाहूल आता, उडाली पळे ही जशी पाखरे
प्रकाशात न्हाल्या दिशा अंबराच्या, तुझ्या स्वागताची सलामी झडे          

ये बाळे , तुझे स्वागत असो !

अनंत आकाशातून उडत आलेलं पाखरू तू 
चांदण्याच्या बागेत अनाहूत उमललेलं फूल तू 
कल्पवृक्षाचा प्रसाद, स्वातीचा संजीवन थेंब तू 
नंदनवनातून आलेली थंड वाऱ्याची झुळूक तू 

हृदयींच्या अंगणात तुझं स्वागत असो 
ये बाळे , इथे तुझं स्वागत  असो !! 

आमचं घर , आमचं  मन तुझी केव्हाची वाट पहात होतं 
इथली उब , इथली  माया तुझ्यासाठी जपून ठेवत होतं 
ये , उत्साहाने टेकव इथे तुझी इवली इवली पाऊले 
फुलव तुझा पिसारा , उमलू दे उत्साहाची फुले 

इथे हर घडी घुमत तुझ्या पावलांचा नाद असो 
ये बाळे , इथे तुझं स्वागत असो !!

आमच्या घराला आता आपलं घर मान 
इथे नाच , इथे बागड ,इथे हास, खेळ छान
आमच्या नेत्रीं असो तुझ्या कौतुकाचा वावर 
कधीही घे विसावा हक्काने आमच्या मांडीवर 

तुझ्या मऊ स्पर्शाने आमचा हर्ष वाढत असो 
ये बाळे , इथे तुझं स्वागत असो !!

श्रावणसर होऊन ये,शीतलता घेऊन ये 
आसावल्या मनासाठी जिव्हाळा घेऊन ये  
तू आता आमची झालीस , तूही आम्हाला आपलं मान
जन्मांतरीचं नातं आपलं पुन्हा एकदा जुळलंय जाण 

आपल्या नात्याची वीण सतत घट्ट होत असो 
ये बाळे , इथे तुझं स्वागत असो !!